“मी जिवंत असेन तर मोर्चात जाणार”; डॉ. दाभोलकरांचा उल्लेख करत विद्यानंद बापट यांचं मोठं वक्तव्य
पुणे: पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला विरोध करत विद्यानंद बापट यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. मात्र, डीजे आणि लाऊडस्पीकरच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी (३ ऑगस्ट) पुण्यातील टिळक रोड परिसरात हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यावर अनेकांनी वेगवेगळ्या भूमिका देखील मांडल्या आहेत.
विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडल्यानंतर आता बापट यांच्या समर्थनार्थ आणि ‘डीजेमुक्ती’साठी रविवारी पुणे महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सहभागी होण्याच्यासंदर्भात बोलताना विद्यानंद बापट यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. “मी जिवंत असेन तर मोर्चात सहभागी होणार आहे”, असं बापट यांनी आज (४ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे.
विद्यानंद बापट काय म्हणाले?
पुण्यात रविवारी ‘डीजेमुक्ती’साठी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चात तुम्ही सहभागी होणार आहात का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना विद्यानंद बापट यांनी म्हटलं की, “हो, मी या मोर्चात सहभागी होणार आहे. आता काल (गुरुवारी) देखील काही ठरलं होतं. मात्र, अचानक हल्ला झाल्याची घटना घडली. त्यामुळे जर मी जिवंत असेन आणि मोर्चात जाण्यायोग्य परिस्थितीत असेन तर मी मोर्चात सहभागी होणार आहे. मला भिती वाटत नाही. पण डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचं काय झालं, ते मॉर्निंग वॉकला निघाले होते. त्यामुळे केव्हा काय होईल हे मी सांगू शकत नाही. त्यामुळे जर मोर्चात जाण्यायोग्य परिस्थितीत मी असेन तर मोर्चात सहभाही होणार आहे”, असं विद्यानंद बापट यांनी म्हटलं आहे.
‘ही’ तुमची संस्कृती आहे का?”, विद्यानंद बापटांचा सवाल
“ध्वनिप्रदूषण आणि रहदारीस अडथळा या दोन गोष्टी टाळून जगातल्या कोणत्याही शहरात तुम्ही उत्सव साजरा करावा,” असं मत विद्यानंद बापट यांनी व्यक्त केलं आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान होणारे ध्वनीप्रदूषण आणि वाहतूक कोंडी यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत, “सध्या संस्कृतीची विकृती झाली आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
पत्रकार परिषदेत बोलताना बापट म्हणाले, “मी कोण आहे यापेक्षा माझा मुद्दा काय आहे हे अधिक महत्त्वाचे आहे. पुणे शहराला तुम्ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून मिरवता, मग हीच तुमची संस्कृती आहे का?” गणेशोत्सवातील सध्याच्या अव्यवस्थेवर बोट ठेवत त्यांनी प्रशासनाच्या आणि आयोजकांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
हा केवळ तात्पुरता विरोध नसून हा लढा यापुढेही असाच चालू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनाला संघटनात्मक रूप देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगताना ते म्हणाले, “या लढ्याला एक संघटित रूप द्यायचे आहे आणि त्यावर नक्कीच काम करायचे आहे. सध्या हे सर्व विचाराधीन असून, सर्व गोष्टी निश्चित झाल्यावरच संघटनेबद्दल अधिकृत घोषणा करेन.”