हो, आमच्याकडून चुका झाल्या, कर्कश आवाज वाढला, स्पर्धा वाढली, आता नियमांचे पालन करू..!

हो, आमच्याकडून चुका झाल्या, कर्कश आवाज वाढला, स्पर्धा वाढली, आता नियमांचे पालन करू..!

 

पुणे : गेल्या काही वर्षांत विशेषतः लॉकडाऊननंतर व्यवसायात शिथिलता आल्याने आमच्याकडूनही चुका झाल्या, कर्कश आवाज वाढला, स्पर्धा वाढली. हे आम्ही १०० टक्के मान्य करतो, अशी कबुली पुणे जिल्हा साऊंड, लाइट आणि जनरेटर असोसिएशनने बुधवारी (दि.२) पत्रकार परिषदेत दिली. मात्र, आता स्वतःहून सुधारणा करत नियमांचे आम्ही पालन करू, असे सांगत गणेशोत्सवाच्या काळात साऊंड सिस्टीमवर सरसकट बंदी घालून किंवा कठोर निर्बंध लावून जिल्ह्यातील लाखो कामगारांवर उपासमारीची वेळ आणू नका; प्रशासनाने ठरवून दिलेल्या डेसिबल मर्यादेत आणि ‘४ बेस, ४ टॉप’च्या नियमांमध्ये व्यवसाय करण्याची आमची पूर्ण तयारी आहे, असेही त्यांनी जाहीर केले.

गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच डीजे मुक्त गणेशोत्सवासाठी विद्यानंद बापट यांच्यासह पुणेकरांनी लढा सुरू केला आहे. त्यामुळे साऊंड व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. लाखो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याच्या भीतीने आता पुणे जिल्हा साऊंड, लाइट आणि जनरेटर असोसिएशनने सहकार्याची भूमिका घेतली आहे. यासंदर्भात असोसिएशनचे अध्यक्ष गणेश काळभोर यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी उपाध्यक्ष सागर सदाशिव सुतार, कार्याध्यक्ष ओंकार पडवळ, कायदेशीर सल्लागार मोहित पालेशाह आणि रिपब्लिकन परिवर्तन पॅंथर्सचे अध्यक्ष गजेंद्र (बाबा) प्रकाश मोरे उपस्थित होते.

लॉकडाऊननंतरच्या काळात नियमांत शिथिलता मिळाल्यामुळे स्पर्धा अवाजवी वाढली, प्रेशर मिड आणि भिंतींसारख्या मोठ्या यंत्रणांमुळे आवाज मर्यादेबाहेर गेला, आमच्याकडूनही चुका झाल्या, हे आम्ही मान्य करतो. म्हणूनच आता आम्ही स्वतःहून सुधारणा करत आहोत,’ असे त्यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ५५, ६५ ते ७५ डेसिबल मर्यादेतच सिस्टीम चालवली जाईल. मिरवणुकीत कर्कश आवाज निर्माण करणारी 'प्लाझ्मा सिस्टीम' व 'प्रेशर मिड' आम्ही स्वतःहून लावणार नाही आणि ऑपरेटर्सचे माईकिंगही पूर्णपणे बंद ठेवले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ते म्हणाले, पुणे जिल्ह्यात सुमारे १५ ते ३० हजार साऊंड, लाइट आणि जनरेटर व्यावसायिक असून, प्रत्येक व्यावसायिकाकडे १० ते २० कामगार काम करतात. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३ ते ४ लाख लोकांची उपजीविका या व्यवसायावर अवलंबून आहे. हा व्यवसाय पूर्णपणे मोसमी (सीझनल) असून वर्षातील ३६५ दिवसांपैकी केवळ १०० दिवस काम मिळते; तरीही कामगारांना वर्षभर सांभाळावे लागते. हे व्यावसायिक गर्भश्रीमंत नसून शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबातील तरुण आहेत. शेती, सोने गहाण ठेवून आणि बँकांकडून लाखो रुपयांचे कर्ज काढून त्यांनी ही यंत्रणा उभारली आहे. अशा वेळी अचानक सरसकट बंदी आल्यास कर्जाचे हप्ते थकतील आणि हजारो कुटुंबे देशोधडीला लागतील.

गणेश मंडळाच्या आपापसातील स्पर्धेमुळे आवाज वाढतो :

साऊंडचा आवाज व्यावसायिक स्वतःहून वाढवत नसून दोन गणेश मंडळे समोरासमोर आल्यावर त्यांच्यातील चढाओढीतून (कॉम्पिटिशन) मर्यादा ओलांडली जाते. त्यामुळे पुणे शहर व जिल्हा ‘कॉम्पिटिशन मुक्त’ व्हावा; दोन सिस्टीम समोरासमोर आल्यास आम्ही स्वतःहून आवाज बंद करू किंवा पोलिसांनी अशा वेळी तत्काळ हस्तक्षेप करावा, असे आवाहनही त्यांनी केले. दरवर्षी ऐन सणासुदीच्या काळात वाद आणि संभ्रम निर्माण करण्यापेक्षा शासनाने एकदाच सर्वंकष व कायमस्वरूपी नियमावली तयार करून द्यावी, अशी मागणी करत दहीहंडी व गणेशोत्सवात परराज्यांतून येणाऱ्या सिस्टीम्सवरही स्थानिक नियमांचे बंधन असावे, असे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

विद्यानंद बापट यांना द्वेषाने नव्हे प्रेमाने भेटणार :

साऊंड सिस्टीमविरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांच्या तांत्रिक मुद्द्यांचा आम्ही आदर करतो आणि त्यांच्याशी द्वेषाने नाही, तर प्रेमाने चर्चा करून वस्तुस्थिती मांडणार असल्याचेही असोसिएशनचे अध्यक्ष गणेश काळभोर यांनी सांगितले. केवळ काही मोजक्या लोकांच्या विरोधामुळे तरुणांच्या हक्काच्या व्यवसायावर गदा आणली गेल्यास शेकडो गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसह गुडलक चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन परिवर्तन पॅंथर्सचे गजेंद्र मोरे यांनी दिला.

गणेशोत्सव तोंडावर, तरी अजून बुकिंग नाही :

शहरात साऊंड मुक्त गणेशोत्सवासाठी वातावरण तयार झाले आहे आणि पोलिसांनी ‘४ बेस, ४ टॉप’ चे नियम लागू केले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव तोंडावर आला तरी साऊंड व्यावसायिकांना अद्यापही फारसे बुकिंग मिळालेले नाही, अशी खंत व्यक्त करीत, काही गणेश मंडळांनी बाहेरील राज्यातून साऊंड सिस्टिम मागविली असल्याचेही असोसिएशनने स्पष्ट केले आहे.