स्पर्धा परीक्षेच्या हजारो विद्यार्थ्यांचा पुण्यात एल्गार; अध्यक्षांना हटवण्याची मागणी, मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
आम्हाला केवळ विश्वासार्हता MPSCवर होती. पण MPSC चा पेपर फुटला आहे. हे कधीही आम्हाला मान्य नव्हते. प्रत्येक विद्यार्थी गोरगरीब असून हलाखीच्या परिस्थितीतून येतो आहे. पण एमपीएससीचा पेपर फुटल्यामुळे प्रत्येकाला एक धोका एमपीएससीने दिला आहे. अध्यक्ष आणि सचिव यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्यावर कठोरात कठोर सीबीआय, सीआयडी सारखी चौकशी लावून यांची प्रॉपर्टी चेक केली पाहिजे. आणि तात्काळ यांना या पदावरून बरखास्त केलं पाहिजे. अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पर्धा परीक्षा विद्यार्थी प्रतिनिधी आणि शिक्षकांसमवेत बैठक झाली. त्यात सरकारने सकारात्मक भूमिका मांडली असली, तरी परीक्षेतील गैरप्रकार प्रकरणी ‘एमपीएससी’च्या अध्यक्षांना पदावरून हटवून त्यांना सहआरोपी करण्याची प्रमुख मागणी अद्याप सरकारने मान्य केलेली नाही. त्यामुळे केवळ आश्वासनांवर आंदोलन मागे घेतले जाणार नाही. मोर्चा ठरल्याप्रमाणे होणार असून, मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच राहील, असे स्पर्धा परीक्षा शिक्षक किरण निंभोरे यांनी सांगितले.
सरकार सकारात्मक
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारची कायमच भूमिका सकारात्मक आहे. चर्चेतून प्रश्न सोडविण्याची सरकारची मानसिकता आहे. या विद्यार्थ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी भूमिका आमदार विक्रम पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) ही एक स्वायत्त संस्था असून अध्यक्षांची नियुक्ती राज्यपाल करतात. त्यामुळे थेट राजीनामा घेण्याचा अधिकार सरकारला नाही. मात्र, चौकशीत दोषी आढळले, तर त्यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी केली जाईल. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायचा की नाही, हा संबंधितांचा निर्णय आहे. चौकशी समितीत विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी किंवा निमंत्रित सदस्य म्हणून कोणाला घेता येईल का, अशी विनंती मी स्वतः मुख्यमंत्र्यांना करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.