तुमच्या मित्रांचं पुनर्वसन करायचं तर पक्षात घ्या, एमपीएससीमध्ये नको; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात, पुण्यात विद्यार्थ्यांचा एल्गार

तुमच्या मित्रांचं पुनर्वसन करायचं तर पक्षात घ्या, एमपीएससीमध्ये नको; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात, पुण्यात विद्यार्थ्यांचा एल्गार

 


पुणे: सत्ताधाऱ्यांना स्वतःच्या मित्रांचे पुनर्वसन करायचे असेल, तर त्यांना खुशाल आपल्या पक्षात घ्यावे; मात्र एमपीएससीसारख्या घटनात्मक संस्थेत भ्रष्ट अधिकाऱ्यांची वर्णी लावू नका. एमपीएससी अध्यक्षांची तात्काळ हकालपट्टी झालीच पाहिजे. सरकारने पुढील तीन दिवसांत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही, तर पुण्यातील शास्त्री रस्त्यावर चक्काजाम करून याहून तीव्र लढा उभारू," असा थेट इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला. "गुन्हे दाखल करायचे असतील तर आमच्यावर करा, पण विद्यार्थ्यांच्या अंगाला हात लावला तर खबरदार," असा सज्जड दमही त्यांनी सरकारला दिला.

स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि संशयास्पद कारभाराविरोधात पुण्यातील हजारो विद्यार्थ्यांचा संयम सुटला असून, शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात खासदार सुप्रिया सुळे, डॉ. विश्वजित कदम, आमदार रोहित पवार यांच्यासह हजारो विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रोहित पवार म्हणाले की, "तलाठी भरतीत झालेला घोटाळा मॅटने मान्य केला आहे. २०१४ पासून एकाच जागेवर ठाण मांडून बसलेले अधिकारी पदोन्नती लाटत आहेत आणि भ्रष्टाचार करत आहेत. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्ताधारी 'नौटंकी' म्हणतात, हे पुरोगामी महाराष्ट्रात कदापि खपवून घेतले जाणार नाही. एमपीएससीची स्वतंत्र भरती प्रक्रिया राबवावी, प्रत्येक जिल्ह्यात आयोगाचे कार्यालय सुरू करावे आणि सर्व परीक्षा ऑफलाइनच घ्याव्यात." मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत राजकीय नेत्यांऐवजी केवळ विद्यार्थी व शिक्षकांच्या शिष्टमंडळानेच चर्चा करावी, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली.

या आंदोलनात डॉ. विश्वजित कदम यांनीही जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत विरोधी पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम उभा राहील, असा विश्वास दिला. "अध्यक्षांचा राजीनामा झालाच पाहिजे" या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी "तरुणाईचे रक्त पिणाऱ्या व्यवस्थेविरोधात 'झुकेगा नही, लढेंगे-जितेंगे'" असा नारा दिला. विद्यार्थी प्रतिनिधी ऋषिकेश गांगुर्डे व नितीन आंधळे यांनी "आमदार फोडले आता पेपर फोडताय, राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही," असा इशारा दिला. शिक्षक प्रतिनिधी सचिन ढवळे, कांगळे सर आणि धनांगे सर यांनी गट 'ब', गट 'क' सह कृषी आणि पीएमसी भरतीतील घोटाळ्यांवर बोट ठेवत संपूर्ण चौकशीची मागणी केली.