एल निनोचा प्रभाव, पावसाची तूट; मुंबईसह राज्यातील प्रमुख धरणात जलसाठा किती? चिंताजनक आकडेवारी
मुंबई : एल निनो प्रभावामुळे मान्सून पावसावर परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांचा पावसाचा काळ महाराष्ट्रातील काही भागांसाठी समाधानकारक ठरलेला नाही. महाराष्ट्रातील काही भाग सोडला तर अनेक जिल्ह्यात परिस्थिती गंभीर बनण्याची चिन्हे आहेत. यातच मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठी किती आहे, याबाबत आलेली आकडेवारी चिंता वाढवणारी असल्याचे म्हटले जात आहे.
महाराष्ट्रातील पावसाची स्थिती बघायची झाली, तर १ जून ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत महाराष्ट्रात सरासरी ८१४.२ मिमी पावसाची गरज होती, पण प्रत्यक्ष ७१७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच महाराष्ट्रात १२ टक्के पावसात तूट पडली आहे. कमी पाऊस झाला आहे. कमी पाऊस झालेल्या भागांमध्ये सर्वाधिक फटका मराठवाडा आणि विदर्भाला बसला आहे. सर्वाधिक तूट मराठवाड्यात म्हणजे ३० टक्के, त्यापाठोपाठ विदर्भ २२ टक्के नोंदवली गेली आहे. कोकण-गोव्यात ८ टक्के तूट आहे. मध्य महाराष्ट्र अपेक्षित सरासरीपेक्षा २ टक्के जास्त पाऊस झाला आहे. नाशिक, पुणे आणि पालघर जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
राज्यातील प्रमुख धरणात जलसाठा किती?
राज्यातील सुमारे तीन हजार लघु, मध्यम, मोठ्या धरणांमध्ये सध्या सरासरी ७६ टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा ९४ टक्के होता. प्रमुख धरणांमधील एकूण जलसाठ्याची स्थिती समाधानकारक असली तरी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही महत्त्वाच्या धरणांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत जलसाठ्यात मोठी घट झाली आहे. पेंच प्रकल्पात सध्या ६२ टक्के जलसाठा असून गेल्या वर्षी याच कालावधीत तो ८३ टक्के होता. इसापूर धरणातील पाणीसाठा सध्या ६९ टक्क्यांवर असून मागील वर्षी तो ९७ टक्के होता. गोसीखुर्द प्रकल्पातील जलसाठाही ६९ टक्क्यांवर आहे. अप्पर वर्धा धरणात सध्या केवळ ५७ टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षी याच वेळी हा साठा ९३ टक्के होता.
मुंबईकरांना मोठा दिलासा
मुंबईत आजवर मोसमी पावसाच्या हंगामात सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली असली तरीही जुलैच्या तुलनेत ऑगस्ट कोरडाच असल्याचे पावसाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबईत केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात २ हजार २१६ मिमी अधिक, तर कुलाबा केंद्रात १ हजार ७६६ मिमी पावसाची नोंद झाली असून ती सरासरीहून अधिक आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि मोडकसागर या प्रमुख धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक जलसाठा आहे. मोडकसागर आणि बारवी धरणे भरल्याने मुंबई आणि परिसराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटल्याचे म्हटले जात आहे.
या प्रमुख धरणांतील पाणीसाठा तुलनेने समाधानकारक
कोयना, जायकवाडी, उजनी, खडकवासला, भंडारदरा आणि मुळा या प्रमुख धरणांतील पाणीसाठ्याची स्थितीही तुलनेने चांगली आहे. मुळा धरण ९५ टक्के भरले आहे. छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागांतील जलसाठ्याबाबत चिंता कायम आहे. अमरावती आणि नागपूर विभागात पाणीसाठ्याची सरासरी सुमारे ६३ टक्क्यांवर आहे.
दरम्यान, पावसाने ओढ दिल्यानंतर धरणांमध्ये उर्वरित कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणी साठा वाढण्याची शक्यता कमी होऊ लागली आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत संभाव्य पाणीटंचाईच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी आतापासून उपाययोजना, नियोजन करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.