मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई
बारामती :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकांमार्फत मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष “Drink and Drive” तपासणी मोहीम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान विविध ठिकाणी वाहनचालकांची ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी करण्यात आली. एकूण ३१ वाहनचालकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळलेल्या ६ वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली.
मद्यप्राशन केल्यानंतर वाहन चालविल्यास वाहन चालकाची निर्णयक्षमता, प्रतिक्रिया देण्याचा वेग आणि वाहना वरील नियंत्रण कमी होते.त्यामुळे गंभीर व प्राणघातक अपघात होण्याचा धोका वाढतो. मद्यप्राशन करून वाहन चालविणे हे केवळ कायद्याचे उल्लंघन नसून स्वतःसह इतर रस्ता वापरकर्त्यांच्या जीविताला ही धोका निर्माण करणारे आहे.
मद्यप्राशन करुन वाहन चालवू नये. अशा परिस्थितीत सार्वजनिक वाहतूक, टॅक्सी अथवा मद्यप्राशन न केलेल्या वाहनचालकाची मदत घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी व मद्यप्राशन करून वाहन चालविण्याच्या प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी “Drink and Drive” विशेष तपासणी मोहीम यापुढेही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहे. विविध ठिकाणी अचानक तपासणी करण्यात येऊन नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे श्री. निकम यांनी कळविले आहे.