ज्ञानेश कुमारांना तात्काळ हटवा, महाराष्ट्रसह ३ राज्यांच्या निवडणुका पुन्हा घ्या - उद्धव ठाकरे
मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयुक्तांच्या मतभेदावर भाष्य केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत. राज्यकर्त्यांना जन की बात ऐकावी लागेल. महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगालच्या निवडणुका पुन्हा घेतल्या पाहिजेत. या तिन्ही राज्याच्या निवडणुका बॅलेटवर घ्या. मुख्य निवडणूक आयुक्त मनमानी कारभार करत आहेत. ज्ञानेश कुमारांना तात्काळ तुरुंगात टाकले पाहिजे. ज्ञानेश कुमार यांनी आधी शिवसेना, त्यानंतर टीएमसीचा घात केला. यापुढच्या काळात सर्व निवडणुका बॅलेटवर व्हायला हव्यात. लोकशाही जगवण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र आले पाहिजे असं त्यांनी सांगितले.
तसेच ज्ञानेश कुमार देशाचे वाटोळे करत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त मनमानी करताहेत असा आरोप २ निवडणूक आयुक्त करतात. याची तक्रार थेट कॅबिनेट सचिवांकडे झाली आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांना तात्काळ पदावरून हटवले पाहिजे. देशाच्या पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार झाली आहे. सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी या निवडणूक आयुक्तांचे कौतुक करतो. या प्रकाराबाबत न्यायव्यवस्थेने सुमोटो दाखल केली पाहिजे. फसवणूक करूनही ज्ञानेश कुमार यांना काढणार नसाल तर आता ही जनता ऐकणार नाही असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली पाहिजे. ज्ञानेश कुमार यांना हटवले नाही तर ते पुरावे नष्ट करतील. देशात लोकशाही मारली जात आहे. पक्ष फोडणाऱ्या टोळीचा म्होरक्या ज्ञानेश कुमार आहे. ज्ञानेश कुमारांना जेलमध्ये टाकून लोकशाही वाचवायला हवी. पश्चिम बंगाल निवडणुकीत ९० लाख मतदारांची नावे वगळली. महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या ६ महिन्याच्या कालावधीत ४५ लाख मतदार वाढवले. आता SIR प्रक्रियेत ४० लाख लोकांवर आक्षेप घेतले गेलेत. त्यामुळे महाराष्ट्र, पश्चिम बंगाल असेल किंवा अन्य कुठेही निवडणूक झाली असेल ती पुन्हा घेतली पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.