विद्यानंद बापट आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? राजकारणातील एन्ट्रीबाबत चर्चांना उधाण
निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील पाच विधान परिषद जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या घोषणेसह संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तीन पदवीधर तर पुणे आणि अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघात निवडणूक होणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक विद्यानंद बापट यांनी लढवावी, असे वकील असीम सरोदे यांनी म्हटले आहे.
विद्यानंद बापट पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवणार?
असीम सरोदे आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हणतात की, माझ्यासोबत उभ्या असलेल्या व्यक्तीचा आता खूप परिचय देण्याची आवश्यकता उरली नाही. ध्वनिप्रदूषणाच्या राक्षसा विरोधात निर्भयपणे उभा असणारा 'विद्यानंद बापट'. अनेकांच्या मनातील दुःख बोलणारा आणि उत्सवांचे विकृत स्वरूप, त्यातील ओंगळवाणेपणा चव्हाट्यावर आणणारा हिरो ठरला आहे. तर - - - विद्याविभूषित, सुसंकृत, विनम्र, अभ्यासू, प्रत्येक सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारा विद्यानंद बापट आज जणू प्रत्येक घरातील आपुलकीचा सदस्य झालेला आहे. भाषेचा स्तर बिघडू न देता, विषयाला धरून बोलणारा आणि समाजाला वैश्विक बनविण्याची क्षमता असणाऱ्या विद्यानंद बापट ने पदवीधर मतदारांमधून निवडणूक लढवावी का? तुम्हाला काय वाटते? अशी विचारणा असीम सरोदे यांनी या पोस्टमध्ये केली आहे.
दरम्यान, भारतीय समाजाला अशाच निर्भीड माणसाची गरज आहे. नक्कीच बापट हे अतिशय विद्या विभूषित आणि तर्ककठोर व्यक्तिमत्व आहेत नक्कीच त्यांना संधी भेटली पाहिजे. विद्यानंद बापट यांनी खरोखरच पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवायला हवी. ते १०० टक्के निवडून येतील. बापट खरेच भारी माणूस, ते जेव्हा बोलतात तेव्हा असे वाटते आपल्या मनातले बोलत आहेत. साधा माणूस, भारी माणूस लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात जायला हवे ही जानभावना आहे. तसेच नक्कीच लढवायला पाहिजे. प्रयोग करून बघायला काय हरकत. तर, लोक एवढी सुज्ञ नाहीत की त्यांना निवडून देतील, अशा कमेंट्स अनेक युझर्सनी केल्या आहेत.