बारामतीत ''इनोव्हेशन व्हॅली'' उभारणार-शरद पवार
बारामती : ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी,उद्योजक आणि सामान्य नागरिकांना जागतिक दर्जाचे ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्या साठी सिलिकॉन व्हॅलीच्या धर्तीवर ''बारामती इनोव्हेशन व्हॅली'' उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
विद्या प्रतिष्ठानच्या ५४ व्या वर्धापनदिना निमित्त शुक्रवार दि.१६ रोजी बारामतीतील गदिमा सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलतांना त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय),संशोधन, नवउद्योजकता आणि सर्वसमावेशक विकासाचा आराखडा मांडला.शरद पवार यांचा घसा खराब असल्याने त्यांचे भाषण संस्थेच्या सचिव ॲड.नीलिमा गुजर यांनी वाचून दाखवले.उपाध्यक्ष ॲड. ए.व्ही.प्रभुणे,विश्वस्त विठ्ठल मणीयार,जय पवार,रेवती लखानी, किरण गुजर,डॉ.राजीव शहा आणि रजिस्ट्रार श्रीश कंबोज या प्रसंगी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, बारामती इनोव्हेशन व्हॅलीचे केंद्र विद्या प्रतिष्ठानचे शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआय असणार असून, हे केंद्र केवळ शिक्षण देणारे ठिकाण न राहता प्रत्यक्ष प्रयोग,संशोधन आणि नवकल्पनांना चालना देणारी 'लिव्हिंग लॅबोरेटरी' म्हणून विकसित केले जाणार आहे.
सध्या या केंद्रात कृत्रिम बुद्धिमत्ता व मशिन्स लर्निंग, डेटा सायन्स, कॉम्प्युटर व्हिजन, भाषा तंत्रज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), क्लाउड, कृषी तंत्रज्ञान, ड्रोन, डिजिटल ट्विन, एआर- व्हीआर, सायबर सुरक्षा, हवामान बदल आणि क्वांटम संस्था ही त्याची जोड केंद्र असतील. इतर संस्थांमधील विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधकांना बारामतीतीलप्रयोगशाळासंगणक आणि डेटा सेंटरचा वापर करता येईल. आर्थिकदृष्ट्या लहान महाविद्यालयांना स्वतंत्र अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणे शक्य नसले, तरी बारामतीतील सुविधा त्यांच्यासाठी खुल्या असाव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली.
शेती ते कारखाना एआयचा वापर
शेतकरी आणि शेतीशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी एआयचा पहिला लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, असे सांगून पवार म्हणाले की, या उद्देशाने पहिल्या टप्प्यात १० हजार शेतकऱ्यांपर्यंत एआय पोहोचविण्यात आले आहे. मातीच्या तपासणीवरून योग्य पीक व खतांचे प्रमाण ठरविणे, ड्रोन आणि उपग्रहांच्या माध्यमातून पिकांवर लक्ष ठेवणे, कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी सूचना देणे आणि हवामानाच्या अंदाजानुसार पाण्याचे नियोजन करणे शक्य होणार आहे.
आरोग्य क्षेत्रालाही लाभ होईल
ग्रामीण रुग्णालयांतील डॉक्टरांना लवकर निदान करण्यासाठी एआयची मदत मिळेल. एक्स-रे, रक्ततपासणी आणि डोळ्यांच्या तपासणीचे निष्कर्ष कमी वेळेत समजण्यास मदत होईल. टेलिमेडिसिनच्या माध्यमातून शहरातील तज्ज्ञ डॉक्टर ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी मार्गदर्शन करू शकतील. औषधनिर्मिती व जैवतंत्रज्ञान क्षेत्रात नवीन औषधांचा शोध अधिक जलद आणि कमी खर्चात घेण्याची संधी निर्माण होईल. बारामती एमआयडीसी तील कारखान्यांचे स्मार्ट कारखान्यांमध्ये रूपांतर करण्यासाठी एआयचा वापर केला जाईल.
पाऊस,दुष्काळ आणि पुराचा अंदाज घेणे, धरणातील पाण्याचे नियोजन करणे आणि सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी एआयची मदत घेतली जाईल.शेतीमाल व औद्योगिक मालाची वाहतूक कमी खर्चात आणि कमी वेळेत होण्यासाठी,तसेच छोट्या दुकानदारांना व्यवसायवृद्धीसाठीही उपयोग होईल.
जागतिक शिक्षण व संशोधन सहकार्यासाठी एमआयटी,स्टॅनफर्ड, ऑक्सफर्ड,बोस्टन विद्यापीठ,आयआयटी, मायक्रोसॉफ्ट,ओपन एआय,इस्रो आणि नासा यांसारख्या संस्था व कंपन्यांशी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचे काम हाती घेण्यात आले असून,त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पवार यांनी सांगितले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सारंग लखानी यांची विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळावर नियुक्ती केल्याची घोषणाही ॲड.नीलिमा गुजर यांनी केली.
दरवर्षी 'ग्लोबल एआय वीक'
बारामतीत दरवर्षी 'ग्लोबल एआय वीक' आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये जगभरातील प्राध्यापक, संशोधक, उद्योजक सहभागी होऊन नव्या कल्पना, प्रोटोटाइप, संशोधन सादर करतील. भारतातील पुढील मोठी एआय कंपनी बारामतीतून निर्माण व्हावी, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.