नवरात्रोत्सवात महिलांची मोफत आरोग्य तपासणी; ‘आपले आरोग्य, आमची सेवा’ उपक्रमा तून महिलांना आरोग्य सेवेचा लाभ
बारामती : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत माळावरची देवी मंदिर परिसरात महिला भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मातोश्री गंगुबाई शिंदे महिला सेवा कक्षाच्या अंतर्गत शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख सुरेंद्र शामसुंदर जेवरे यांच्या वतीने ‘आपले आरोग्य, आमची सेवा’ या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत महिलांची हिमोग्लोबिन तपासणी,रक्तातील साखरेची तपासणी, वजन मोजणे,नाडीचे ठोके तपासणे तसेच रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजणे अशा विविध आरोग्य तपासण्या मोफत करण्यात येत आहेत.
याशिवाय महिला भाविकांसाठी हात,पाय, मान,डोके आणि डोळे यां संबंधित मसाज सेवाही उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
महिला घर,संसार, कुटुंब प्रपंच आणि मुलांच्या जबाबदाऱ्या सांभाळतांना अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेतांना महिलांना अनेक शारीरिक आणि मानसिक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे महिलांनीही आपल्या आरोग्याला प्राधान्य देऊन वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे. याच जाणिवेतून महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे सुरेंद्र शामसुंदर जेवरे यांनी सांगितले.
नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला भाविकांना आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांचे मध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे,हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत या मोफत आरोग्य तपासणी उपक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन सुरेंद्र शामसुंदर जेवरे यांनी केले आहे.