दातृत्वाच्या महाउत्सवात ११०० कुटुंबांचे योगदान!

दातृत्वाच्या महाउत्सवात ११०० कुटुंबांचे योगदान!

 

​दान उत्सवात तीन ट्रक संसारोपयोगी साहित्य संकलित []गरजूंची दिवाळी गोड करण्यास बारामतीकर सरसावले

बारामती : स्वतःच्या दिवाळीचा आनंद दुसऱ्याच्या आयुष्यातही फुलविण्याच्या सामाजिक जाणीवेतून बारामतीकरांनी दातृत्वाचा वस्तुपाठ घालून दिला.अजिंक्य संस्थेच्या वतीने आयोजित दान उत्सवाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुमारे ११०० कुटुंबांनी विविध वस्तू दान केल्या. यातून तब्बल १७०० गोणी म्हणजेच जवळपास तीन ट्रक साहित्य संकलित झाले.    

      यंदा संस्थेच्या या उपक्रमाचे नववे वर्ष होते.बारामती नगर परिषदेसमोरील तीन हत्ती चौकात रविवार दि. २५ रोजी हा उपक्रम पार पडला,त्यास बारामती करांनी भरभरून दान देत प्रतिसाद दिला.    

    कपडे,साड्या,ब्लँकेट, पादत्राणे,शालेय दप्तरे, पुस्तके आणि वह्या अशा विविध वस्तू नागरिकांनी दान केल्या.कांही नागरिकांनी नवीन कपड्यांचे संच आणि नवीन ब्लँकेट देत या उपक्रमात योगदान दिले.

​माणुसकीचा सेतू  

 ​संकलित केलेले साहित्य पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील गुंज संस्थेच्या केंद्राकडे रवाना करण्यात आले. तेथून हे साहित्य गरजूंपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.दिवाळी सणात गरजू कुटुंबांनाही आवश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात,या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.गेले नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाला यंदाही मिळालेला प्रतिसाद सामाजिक बांधिलकीची जाणीव अधोरेखित करणारा ठरला आहे.